
परभणी, 08 जून (हिं.स.)। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात 8 ते 12 जून 2026 या कालावधीत आयोजित पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. मनोज घाटे उपस्थित होते. यावेळी प्रकल्प सह-समन्वयक डॉ. संदीप रिंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक संस्थांच्या पदाधिकार्यांच्या सक्षमीकरणासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. येवतीकर यांनी ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादक संस्थांसाठी शेळीचे दूध व मांस प्रक्रिया उद्योग हा स्वावलंबन आणि अर्थार्जनाचा प्रभावी पर्याय ठरू शकतो, असे मत व्यक्त केले.
या प्रशिक्षणात बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक संस्थांच्या 20 पदाधिकार्यांचा सहभाग असून त्यांना विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान शेळ्यांच्या विविध जाती, योग्य निवड, संतुलित आहार, गोठा व्यवस्थापन, मांस उत्पादन व विक्री व्यवस्थापन आदी विषयांवर महाविद्यालयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आणि अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रास्ताविकात डॉ. संदीप रिंढे यांनी प्रशिक्षणातील विविध व्याख्याने, प्रात्यक्षिके आणि कौशल्य विकास उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. उद्घाटनप्रसंगी प्रशिक्षणार्थींना साहित्य किटचे वितरण डॉ. प्राणेश येवतीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis