खेड तालुक्यात मोटार दरीत कोसळून पाच जण जखमी
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे-बोरज येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात अल्टो कार सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधील पाच प्रवासी जखमी झाले. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाऊन परत ठाण्याकडे निघालेल्या या कुटुंबाच्य
खेड तालुक्यात मोटार दरीत कोसळून पाच जण जखमी


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील मोरवंडे-बोरज येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात अल्टो कार सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधील पाच प्रवासी जखमी झाले.

गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाऊन परत ठाण्याकडे निघालेल्या या कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अल्टो कार (एमएच ०४ केडी ६१२८) ही रविवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथून ठाण्याच्या दिशेने निघाली होती. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही कार खेड तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील सुरभी हॉटेलसमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक गाय आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली. त्यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले.

अपघातात सिद्धी नाईक (वय २९), रिद्धी नाईक (वय २९), स्नेहल नाईक (वय ५८), सिद्धेश नाईक (वय ६५) आणि तेजस बोरकर (वय ३१) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमी ठाणे येथील रहिवासी असून त्यांच्या प्रकृतीवर धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य अपघात मदत सेवा देणारी रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. चालक सूरज हंबीर यांनी तत्परता दाखवत जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्वरित उपचारासाठी भरणे येथील धन्वंतरी रुग्णालयात हलविले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रात्री वेळी महामार्गावर भटक्या जनावरांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande