गुटखा विरोधी मोहिमेंतर्गत लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २७.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 08 जून (हिं.स.)। : नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ ते ७ जून २०२६ या कालावधीत परिक्षेत्रातील २,७०२ पानटपऱ्यांची झाडाझडती घेण्यात आ
पोलीस कारवाई


लातूर, 08 जून (हिं.स.)।

: नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मोहिमेच्या पहिल्याच आठवड्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. १ ते ७ जून २०२६ या कालावधीत परिक्षेत्रातील २,७०२ पानटपऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ३० गुन्हे दाखल करण्यात आले असून ६७ लाख २ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ जूनपासून नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये विविध कारवाया करण्यात आल्या.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार नांदेड जिल्ह्यात ५३० पानटपऱ्यांची तपासणी करून ११ गुन्हे दाखल करण्यात आले. येथून २५ लाख २१ हजार ७४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ आरोपींवर कारवाई झाली आहे.

परभणी जिल्ह्यात ८३९ पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. तेथे ९ गुन्हे दाखल करून १२ लाख ६४ हजार ४३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात ७२४ पानटपऱ्यांची तपासणी करून ३ गुन्हे दाखल करण्यात आले. येथून १ लाख ६९ हजार ५३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ आरोपींवर कारवाई झाली.

लातूर जिल्ह्यात ६०९ पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून परिक्षेत्रातील सर्वाधिक २७ लाख ४७ हजार ३५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच १८ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलीस विभागाने पानटपऱ्यांबरोबरच संशयित साठवणूक स्थळांचीही तपासणी सुरू ठेवली आहे. पुढील काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नागरिकांकडून अवैध व्यवसायांची माहिती मिळावी यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. ९१ ५० १०० १०० या क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सॲप संदेशाद्वारे गुटखा, अमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून परिसर गुन्हेमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

परिक्षेत्रातील कारवाई एका नजरेत :

तपासणी केलेल्या पानटपऱ्या : २,७०२

दाखल गुन्हे : ३०

आरोपी : ४८

जप्त मुद्देमाल : ₹६७,०२,६७१

लातूर जिल्ह्यात जप्ती : ₹२७,४७,३५६ (सर्वाधिक)

परभणी : ₹१२,६४,०४३

नांदेड : ₹२५,२१,७४१

हिंगोली : ₹१,६९,५३१

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande