
ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान
परभणी, 08 जून (हिं.स.)। मानवत ते मानोली रस्त्यावर एका शेताच्या बांधावर एक अज्ञात मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, प्राथमिक फॉरेन्सिक अहवालात मृतदेहावर कोणत्याही जखमा नसल्याचे समोर आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला.
फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काय आले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सांगाड्याचे विच्छेदन आणि फॉरेन्सिक परीक्षण करण्यात आले आहे. या तपासणीत मृतदेहाच्या कवटीवर किंवा हाडांवर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या अथवा मारहाण झाल्याच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे मृत्यूचे गूढ वाढले असून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आढळून आलेल्या मानवी सांगाड्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे. या वर्णनाचा कोणताही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा याबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ मानवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis