
हुतात्मा चौकातून शासनाविरोधात एल्गार; शेकडो शेतकरी आणि वनजमीन धारकांचा सहभाग
नांदगाव, 08 जून (प्रतिनिधी): तालुक्यातील वनजमीन धारक आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आजपासून नांदगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे.
आंदोलनाची सुरुवात शहरातील हुतात्मा चौक येथून करण्यात आली. यावेळी शेतकरी आणि वनजमीन धारकांनी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या हक्काची जमीन मिळालीच पाहिजे आणि प्रशासकीय दिरंगाईचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर आंदोलकांनी रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलकांनी सांगितले की, १६ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक पायी लाँग मार्च काढण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनजमीन धारकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही नांदगाव तालुक्यात या आश्वासनांची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या आंदोलनात तालुक्यातील शेकडो वनजमीन धारक, शेतकरी, कष्टकरी आणि किसान सभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे किसान सभेचे नेते विजय दराडे यांनी प्रशासनावर तीव्र टीका करत सांगितले की, लाँग मार्चनंतर शासनाने आदेश दिले असतानाही वन विभाग आणि तहसील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी त्यांच्या हक्काच्या जमिनींपासून वंचित राहिले आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.
दरम्यान, आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, पुढील काही दिवसांत या प्रश्नावर तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV