
जळगाव, 08 जून (हिं.स.) | यंदाच्या उन्हाळ्यात जळगाव जिल्ह्यात नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. अनेक दिवस तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे राहिल्याने उकाड्याने जनजीवन त्रस्त झाले. उन्हाच्या झळांमुळे धरणांतील पाणीसाठा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ताज्या अहवालातून दिलासादायक चित्र समोर आले आहे. अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यम सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या एकूण ३४.३६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा १९.५८ टक्के होता. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय अधिक पाणी शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये सुकी धरणात सर्वाधिक ६७.११ टक्के जलसाठा असून ते पाणीसाठ्याच्या बाबतीत अव्वल ठरले आहे. त्यानंतर जळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे वाघूर धरण ६४.८३ टक्के जलसाठ्यासह समाधानकारक स्थितीत आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत मोठी चिंता नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे बोरी धरण पूर्णपणे कोरडे पडले असून तेथील पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. त्यामुळे त्या परिसरातील पाणी व्यवस्थापनाचे आव्हान कायम असून मान्सूनच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे धरणांमधील वाढीव पाणीसाठ्यामुळे जळगावकरांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे हवामान खात्याने दिलेल्या एका इशाऱ्याने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
यंदा ‘एल् निनो’ स्थिती सक्रिय होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.’एल् निनो’चा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होतो, ज्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा इशारा जर खरा ठरला, तर जळगाव जिल्ह्याला आगामी काळात कमी पावसाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे शेतकरी वर्गात काहीशी धाकधूक वाढली आहे. सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापूस लागवडीची कामे सुरू केली आहेत. मात्र, ‘एल् निनो’च्या संकटामुळे आगामी काळात पावसाने ओढ दिली, तर पिके संकटात येण्याची भीती आहे. त्यामुळे सद्यस्थितीत उपलब्ध असलेला पाण्याचा साठा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या नियमित आगमनाकडे लागले आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास धरणांतील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर