
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। इंधनाच्या वाढत्या दरांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक भारात मोठी वाढ होत असल्याने डिझेल बचतीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘इंधनाची बचत म्हणजेच इंधनाची निर्मिती’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेलची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट मायलेज देणाऱ्या चालकांना विशेष भत्ता आणि पुरस्कार देण्यात येणार असून आगारांनाही आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे इंधन बचतीसाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.एसटी महामंडळाच्या खर्चामध्ये इंधन खर्चाचा सर्वाधिक वाटा असल्याने डिझेल बचतीवर विशेष भर देण्यात येत आहे. सर्व आगारांना निश्चित उद्दिष्ट देऊन त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.चालकांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीचा थेट परिणाम बसच्या मायलेजवर होत असल्याने किलोमीटर प्रतिलिटर (KPL) कमी असलेल्या चालकांचे समुपदेशन आणि पुनर्प्रशिक्षण केले जाणार आहे.
वेगावर नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, इंजिन अनावश्यकपणे सुरू न ठेवणे आणि ब्रेकचा सुयोग्य वापर यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.या संदर्भात सोलापूर विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितले की, “डिझेलची बचत करताना प्रत्येक थेंब वाचवणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण करणे आहे. अधिकारी, कर्मचारी आणि चालकांनी जबाबदारीने काम केल्यास ही बचत भविष्यात महामंडळासाठी मोठी ताकद ठरेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड