
लातूर, 08 जून (हिं.स.)। नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे. पोलीस ठाण्याच्या पथकाने एकूण 10 हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात दिले आहेत.
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन आदी ठिकाणांहून मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली.
गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजनवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकातील पोलीस अंमलदार योगेश चिचोलीकर यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाईल शोधून काढले.
या कारवाईत अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित मोबाईलधारकांना परत करण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis