महायुतीत बंडखोरी, ‘संकटमोचक’ महाजन अपयशी; एकनाथ खडसेंचा थेट हल्लाबोल
जळगाव, 08 जून (हिं.स.) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये उघडपणे बंडखोरी झाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (श
महायुतीत बंडखोरी, ‘संकटमोचक’ महाजन अपयशी; एकनाथ खडसेंचा थेट हल्लाबोल


जळगाव, 08 जून (हिं.स.) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीत महायुतीमध्ये उघडपणे बंडखोरी झाली असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधत, महायुतीतील बंडखोरी रोखण्यात ते अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.जळगाव विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील दोन्ही पक्षांनी दावा केला होता. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मुलासाठी ही जागा मिळवण्यासाठी आग्रही होते. मात्र, ऐनवेळी ही जागा भाजपकडे गेली आणि नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयामुळे गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आमदार किशोर पाटील यांनीही उघडपणे भाजपविरोधात नाराजी व्यक्त करत, “पहिला बंडखोरीचा फटका आम्हालाच बसला,” असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.

जळगावातील या सर्व बंडखोरीवर भाष्य करताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता जोरदार टोमणा मारला. खडसे म्हणाले “महायुतीमध्ये आता अंतर्गत कुजबूज आणि धुसफूस वाढली आहे. स्वतःला ‘संकटमोचक’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांना आपल्याच मित्रपक्षातील बंडखोरी आणि नाराजी रोखता आलेली नाही, हे यावरून स्पष्ट होते. जळगावात शिवसेना आणि भाजपमधील दरी आता स्पष्टपणे वाढली आहे.निवडणुकीच्या सध्याच्या स्थितीवर बोलताना खडसेंनी एक खळबळजनक वक्तव्य केले. “संख्याबळाचा विचार केला तर भाजपकडे मते अधिक आहेत, त्यामुळे महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन हे निवडून येऊ शकतात. मात्र, पडद्यामागे अजूनही निवडणुकीची खरेदी-विक्री सुरू आहे, फक्त अजून बाजारात भाव फुटलेला नाही,” अशी गंभीर टीप त्यांनी रोखठोकपणे मांडली.जागावाटपावरून सुरू असलेला हा वाद केवळ विधान परिषदेपुरता मर्यादित नसून आगामी विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद उमटतील, असा इशारा राजकीय विश्लेषकांनी दिला आहे. महायुतीमधील घटक पक्ष जर आगामी काळात संगणमताने आणि एकदिलाने लढले नाहीत, तर त्यांना याचा मोठा फटका बसेल, अशीच चिन्हे सध्या जळगावात दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande