सोलापूर - मोहोळमध्ये उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त
सोलापूर, 08 जून (हिं.स.)। मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या ठिकाणी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिस चौकीसमोरच वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिका
सोलापूर - मोहोळमध्ये उड्डाणपुलाखाली अतिक्रमण; वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त


सोलापूर, 08 जून (हिं.स.)। मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोरील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या ठिकाणी असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिस चौकीसमोरच वाहतूक विस्कळीत होत असल्याने नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पंढरपूरकडून सोलापूर तसेच पुण्याकडून पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक याच उड्डाणपुलाखालून होते. त्याचबरोबर मोहोळ शहरातून बस स्थानक आणि शहरालगतच्या भागाकडे जाणारी वाहतूकही याच ठिकाणाहून होते. मात्र, मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.काही महिन्यांपूर्वी याच परिसरात एसटी बसखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतरही वाहतूक व्यवस्थेत ठोस सुधारणा झालेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

उड्डाणपुलाखाली दुचाकी व चारचाकी वाहनांची बेकायदेशीर पार्किंगही मोठ्या प्रमाणात होत असून याकडे वाहतूक शाखेचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. मोहोळ शहरात सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी शाळा व महाविद्यालयांसाठी या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत अपघाताची शक्यता वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande