
जळगाव , 08 जून (हिं.स.) गेल्या काही दिवसांतील कडक उन्हाळ्यानंतर बळीराजासह सर्वच जण ज्याची चातकासारखी वाट पाहत होते, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात धडकला आहे. राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली असली, तरी जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र मान्सूनच्या दमदार पावसासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १५ जूनपर्यंत जळगाव शहर आणि जिल्ह्यात तापमान पुन्हा एकदा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या काळात हवामान कोरडे राहणार असून उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असेल. सध्या जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड सुरू केली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनानंतर जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांमध्ये पेरणीची लगबगही सुरू झाल्याचे चित्र आहे.मात्र, जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे दमदार पाऊस झाल्याशिवाय आणि किमान १५ जूनपर्यंत तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. १५ जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यासह इतर भागांतही काही प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो; मात्र पेरणीसाठी आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस होण्याची शक्यता या काळात कमीच असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे हवामान विभागाच्या आधीच्या अंदाजानुसार १२ जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता मान्सूनचा मुक्काम कोकणातच अधिक काळ वाढण्याची चिन्हे असल्याने जळगावकरांना मान्सूनसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर