महामानवांच्या विचारकार्याचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे : मंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, 08 जून (हिं.स.)। शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासनांची उभारणी आणि विस्तार यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तेथे त्यांच्या विचारकार्याचा नियोजनबद
शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण


कोल्हापूर, 08 जून (हिं.स.)। शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासनांची उभारणी आणि विस्तार यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तेथे त्यांच्या विचारकार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन मंत्री आबिटकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठामध्ये शरण अध्यासनाच्या बरोबरीनेच महावीर अध्यासन, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन आणि कै. डॉ. ग.गो. जाधव अध्यासन इत्यादी कार्यरत असून त्यांनाही शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका राहिलेली आहे. शरण साहित्य अध्यासन इमारतीच्या पुढील टप्प्याला गतिमानता देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. महात्मा बसवेश्वरांचे उत्तुंग कार्य आणि प्रेरक विचार यांचा सर्वदूर प्रसार होण्याच्या दृष्टीने सार्वत्रिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महात्मा बसवेश्वर हे युगप्रवर्तक क्रांतीकारक होते. नितीमूल्यांवर चालणारा समाज त्यांना अभिप्रेत होता. त्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. त्यांचे जीवनचरित्र आणि कार्य यांच्यावर विद्यापीठात मोठे संशोधनकार्य व्हावे आणि त्याला भरीव सामाजिक पाठबळ लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande