
नांदेड, 08 जून (हिं.स.)।
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला नवे वळण दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीतील अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम मिळाला.
महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने नांदेडची जागा भाजपच्या वाट्याला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षशिस्तीला प्राधान्य देत माघार घेतली. मात्र या निर्णयामागे केवळ पक्षादेश आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांची बीजे पेरण्याचा प्रयत्न, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हाडवैऱ्यांपासून राजकीय सहकाऱ्यांपर्यंतचा प्रवास
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या दोन दशकांत जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि विविध स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात जोरदार राजकीय लढती दिल्या. अनेकदा त्यांच्या समर्थकांमध्येही तीव्र राजकीय ध्रुवीकरण पाहायला मिळाले.
विशेषतः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव करत जिल्ह्याच्या राजकारणात मोठा राजकीय संदेश दिला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांतील राजकीय दुरावा अधिकच ठळक झाला. त्यामुळे आज हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येऊन महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकत्रितपणे आवाहन करताना दिसणे, हीच बाब चर्चेचा विषय ठरली आहे.
पक्षशिस्त की राजकीय वास्तव?
पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी पक्षाचा आदेश सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले. महायुतीच्या निर्णयाचा सन्मान करत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आश्वासनही दिले. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते, हा केवळ पक्षशिस्तीचा प्रश्न नसून बदलत्या राजकीय परिस्थितीची गरजही असू शकते.
राज्यातील सत्तासमीकरणे बदलल्यानंतर अनेक ठिकाणी पारंपरिक प्रतिस्पर्धी नेते एकाच आघाडीत आले आहेत. नांदेडमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. त्यामुळे हे मनोमिलन वैचारिक एकात्मतेपेक्षा राजकीय अपरिहार्यतेतून घडले असल्याची चर्चा आहे.
राजकीय वर्तुळात आता एकच प्रश्न विचारला जात आहे विधान परिषद निवडणुकीपुरती ही एकजूट आहे की भविष्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात राजकीय समन्वय कायम राहणार आहे? जर महायुतीचे सूत्र स्थानिक स्तरावरही लागू झाले, तर नांदेडच्या राजकारणातील अनेक पारंपरिक समीकरणे बदलू शकतात.
निवडणूक झाली तिरंगी
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण पाटील चिखलीकर, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सोमठाणकर आणि माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
मात्र महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कृष्णा पाटील अष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक आता तिरंगी झाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis