
यंदा मृग नक्षत्राचे वाहन बेडूक
अमरावती, 08 जून (हिं.स.) | सामान्यतः 7 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. मात्र, यंदा सूर्य सोमवार 8 जूनला मृग नक्षत्रात प्रवेश करतोय. शेतकरी आनंदाने मृगाचे पाणी म्हणजे सोन्याचे पाणी. म्हणजे मृग नक्षत्रात पडणारा पाऊस शेतीसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
उल्लेखनीय म्हणजे यंदा मृग नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. वाहन बेडूक म्हटल्यानंतर पावसाचे प्रमाण चांगले, अशी शेतकऱ्यांची धारणा. मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही. किमान १५ जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे.
त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
मृग नक्षत्रात बेडूक हे वाहन हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणाऱ्या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी 'रोहिणी' नक्षत्रापासूनहोत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास कहा 'मृग' नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला 'मृग लागले' असे म्हणतात. प्रत्त्येक नक्षत्राचे विशिष्ट वाहन असते यंदा मृग नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. पंचांगानुसार, मृग नक्षत्रात बेडूक हे वाहन असणे म्हणजे चांगली पर्जन्यवृष्टी आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पण, असे असले तरी किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी