
नांदेड, 08 जून (हिं.स.)नायगाव बाजार तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ९ ते ११ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये ज्या ग्रामपंचायतींची प्रभागरचना पूर्ण झाली आहे, अशा ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी व सहायक कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील शेळगाव छत्री, खैरगाव, घुंगराळा, कृष्णूर, कुंटूर, मेळगाव, बरबडा, नरसी, होटाळा, गडगा, मांजरम, कोलंबी, रातोळी, खंडगाव, रानसुगाव, औराळा यासह एकूण ६८ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीची प्रक्रिया ९, १० आणि ११ जून रोजी सकाळी ११ वाजता आणि दुपारी २ वाजता पार पडणार आहे. नियुक्त प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण करून आवश्यक नमुने, अहवाल व पडताळणीची कागदपत्रे १२ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis