
नांदेड, 08 जून (हिं.स.)जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, अवघ्या काही तासांच्या किरकोळ पावसानंतरच शहरातील नाल्यांमधील घाण पाणी थेट रस्त्यावर आल्याने, महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांचे पितळ उघडे पडले आहे. पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील मुख्य नाल्यांची स्वच्छता न झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरात दरवर्षी महापालिकेकडून नालेसफाईसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आनंदनगर, वसंतनगर, विष्णूनगर, दत्तनगर, मगनपुरा, शाहूनगर, नाईकनगर यांसह इतर प्रमुख प्रभागांमध्ये केवळ 'थातूरमातूर' नालेसफाई झाल्याचे चित्र आहे. विशेषतः आनंदनगर भागातील रस्त्यांना तर दरवर्षी नदीचे स्वरूप प्राप्त होते. पाऊस सुरू होताच रस्त्यांवरून गुडघाभर पाणी वाहू लागते. त्यामुळे महापालिकेची ही नालेसफाई केवळ 'फोटो सेशन' पुरतीच मर्यादित आहे का, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
दुसरीकडे, लोकप्रतिनिधींचे या गंभीर समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरते मतांचा जोगवा मागण्यासाठी आणि घोषणांचा पाऊस पाडण्यासाठीच आहेत का, अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. नाले तुंबले असून, पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्त्यांवर सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेच्या या ढिसाळ नियोजनामुळे नांदेडकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis