माणगावच्या मांगरूळमध्ये वृक्षारोपणासह संविधान जनजागृती
रायगड, 08 जून (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शिवराज्याभिषेक दिन आणि भारतीय संविधान जनजागृतीचा संदेश देणारा विशेष उपक्रम मांगरूळ बौद्धवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वृक्षारोपण, संविधान ज
Promotion of constitutional values and determination to conserve trees


Promotion-of-constitutional-va


रायगड, 08 जून (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या वतीने पर्यावरण संवर्धन, शिवराज्याभिषेक दिन आणि भारतीय संविधान जनजागृतीचा संदेश देणारा विशेष उपक्रम मांगरूळ बौद्धवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वृक्षारोपण, संविधान जागृती आणि शिवराज्याभिषेक दिनाचे स्मरण अशा तिहेरी उद्दिष्टांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात पंचशील वंदनेने झाली. राजरत्न लोखंडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. संविधान जनजागृती सत्रात भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. तसेच नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी संविधानाचे सामाजिक परिवर्तनातील योगदान अधोरेखित करत जनजागृती मोहिमांची गरज स्पष्ट केली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टी आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावरही प्रकाश टाकला. पर्यावरण संरक्षणाविषयी बोलताना त्यांनी शिवकालीन निसर्ग संवर्धनाच्या विचारांचा संदर्भ देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान संविधान प्रश्नमंजुषा, पाक्षिक संविधान बैठका आणि विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.

यावेळी संघाचे पदाधिकारी, रमाई महिला मंडळाच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मांगरूळ बौद्धजन सेवा संघाच्या वतीने आयोजित वृक्षारोपण व संविधान जनजागृती कार्यक्रमात सहभागी झालेले पदाधिकारी, महिला मंडळ सदस्य व ग्रामस्थ.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande