रत्नागिरी : खेर्डी बाजारपेठेत महामार्गावरील पाणी साचण्याबाबत आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । चिपळूण तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेत पहिल्याच पावसात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली अस
रत्नागिरी : खेर्डी बाजारपेठेत महामार्गावरील पाणी साचण्याबाबत आंदोलनाचा इशारा


रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । चिपळूण तालुक्यातील खेर्डी बाजारपेठेत पहिल्याच पावसात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली असून संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी दिला आहे.

चिपळूण-कराड मार्गावरील खेर्डी बाजारपेठ परिसरात पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. महामार्गाच्या कामादरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी पाणी गटारात जाण्याऐवजी थेट रस्त्यावर येत असल्याने रस्त्याचा मोठा भाग पाण्याखाली जात आहे.

यामुळे व्यापाऱ्यांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होत असून नागरिकांनाही घाणेरड्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तसेच वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे चिखलयुक्त पाणी पादचारी व प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

अशोक पवार यांनी सांगितले की, महामार्गाचे काम करताना संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनीकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली नाही. परिणामी प्रत्येक पावसात रस्त्यावर नदीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे अपघातांचा धोकादेखील वाढला आहे.

या समस्येबाबत ग्रामपंचायतीला तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्याम खुणेकर यांना माहिती देण्यात आली असून त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande