
पुणे, 08 जून (हिं.स.) शहरी गरीब योजनेत महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर येथील मॅग्नम रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात पुणे महापालिकेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हे रुग्णालय शिवाजीनगर येथील हार्डीकर रुग्णालयाच्या आवारात कार्यरत होते. सन २०१७ मध्ये मॅग्नम रुग्णालयाला शहरी गरीब योजनेच्या (एमपॅनल) यादीत समाविष्ट करण्यात आले होते. हा निर्णय तत्कालीन आरोग्य प्रमुख आणि शहरी गरीब योजना विभाग प्रमुख यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाला नवा वळण मिळाला जेव्हा संबंधित स्वाक्षरी करणाऱ्या डॉक्टरांनी ही स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगत महापालिकेकडे तक्रार केली. तसेच, ज्या नावाने योजनेचा लाभ घेतला जात होता ते रुग्णालय आता अस्तित्वात नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.यानंतर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमली. समितीने सादर केलेल्या अहवालात मॅग्नम रुग्णालयाने महापालिकेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानुसार शहरी गरीब योजना विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु