
पुणे, 08 जून (हिं.स.) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून आतापर्यंत १,८३७ एकर जागेसाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे (प्रतिज्ञापत्रे) जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत. हे क्षेत्र एकूण भूसंपादनाच्या सुमारे ६० टक्क्यांहून अधिक आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या माहितीनुसार, ७ मेपासून सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेत आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला असून सात गावांमधील सुमारे ३,००० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे.
प्रारंभी जमीन मोजणीवेळीच जवळपास ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शवली होती.राज्य सरकारने या प्रकल्पासाठी प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपये मोबदला निश्चित केला असून आतापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. एकूण भूसंपादनासाठी सुमारे ६,००० कोटी रुपयांची आवश्यकता असून त्यासाठी एमआयडीसीने हुडकोकडून कर्ज उचलले आहे. त्यातील पहिला ५०० कोटी रुपयांचा हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा झाला आहे.दरम्यान, भूसंपादनासाठी संमतीपत्रे देण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांत संपणार असल्याने उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. प्रकल्पामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असली तरी अंतिम टप्प्यातील जमीन हस्तांतरण प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु