
रायगड, 08 जून (हिं.स.) : महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कॅप्टन एस. जे. इझेकल मेमोरियल महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कुलाबा रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लबचा युवा नेमबाज मल्हार राहुल कदम याने उल्लेखनीय कामगिरी करत एकाच स्पर्धेत तीन कांस्यपदके पटकावली आहेत.
महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत मल्हारने 10 मीटर एअर रायफल प्रकारात 400 पैकी 382 गुणांची उत्कृष्ट नोंद केली. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने युथ, सब-युथ आणि ज्युनियर या तिन्ही गटांमध्ये प्रत्येकी एक अशी एकूण तीन कांस्यपदके आपल्या नावावर केली.
राज्यातील नेमबाजांसाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांकडे वाटचाल करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत मिळवलेले यश मल्हारच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे, कठोर सरावाचे आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित, शीला कानूंगो, चंद्रकांत पुजारी तसेच दुष्यंत चतुर्वेदी उपस्थित होते.
सध्या सेंट मेरी हायस्कूल येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या मल्हारला प्रशिक्षक योगेश गडमाळे, मेहुल राठोड, मंदार गडकरी आणि यतिराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.मल्हारच्या या यशामुळे कुलाबा रायफल अँड पिस्टल शूटिंग क्लबसह रायगड जिल्ह्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले असून त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)