
पुणे, 08 जून (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानक आणि इतर शहरातील बस स्थानकांवर भिक्षेकरी, बेघर व्यक्ती आणि गर्दुल्यांचा वाढता वावर प्रवासी तसेच प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. विशेषतः पुणे रेल्वे स्थानक परिसरात काही व्यक्तींनी कायमस्वरूपी ठाण मांडल्याने प्रवाशांना अस्वच्छता, गैरसोय आणि सुरक्षेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते.या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानक परिसरातील अतिक्रमण, भिक्षेकरी आणि संशयित व्यक्तींच्या वावरावर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांनी ही मोहीम अधिक तीव्र केली.या मोहिमेदरम्यान समुपदेशन करूनही जागा न सोडणाऱ्या भिक्षेकऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. संबंधितांना न्यायालयासमोर हजर करून भिक्षेकरी सेवा केंद्रांमध्ये पाठविण्यात आले.गेल्या दोन महिन्यांत या मोहिमेअंतर्गत तब्बल ६० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानक परिसरात शिस्त, स्वच्छता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु