
छत्रपती संभाजीनगर, 08 जून (हिं.स.)छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर लासूर स्टेशनजवळील डोणगाव परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका महिला आणि अल्पवयीन मुलीचा जीव गेला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव कार सुरक्षा कठडा तोडून सुमारे २० फूट खोल पुलाखाली कोसळली. या दुर्घटनेत हुमेरा मोहसिन शेख आणि हरिम जुनेद अहमद यांचा जागीच जीव गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस व महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis