शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल
मनमाड उपजिल्हा रुग्णालयात राडा मनमाड, 08 जून (हिं.स.)। - शहरात झालेल्या पहिल्याच पावसात भिंत कोसळून जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाहीत असा आरोप करत सत्ताधारी शिंदे गटाचे नगरसेवक विशाल राजेंद
शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल


मनमाड उपजिल्हा रुग्णालयात राडा

मनमाड, 08 जून (हिं.स.)।

- शहरात झालेल्या पहिल्याच पावसात भिंत कोसळून जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, डॉक्टरांनी वेळेवर उपचार केले नाहीत असा आरोप करत सत्ताधारी शिंदे गटाचे नगरसेवक विशाल राजेंद्र आहिरे आणि त्यांच्या साथीदारांनी उपजिल्हा रुग्णालयात धुडगूस घातला. संतप्त झालेल्या नगरसेवकांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हा संपूर्ण थरार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रप्रकरणी फिर्यादी डॉ. योगीराज हरिशचंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून नगरसेवकासह इतरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की काल मनमाड शहरात मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मातोश्री रमाबाई नगर येथील रहिवासी संजय विठ्ठल संसारे यांच्या घराची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत संजय संसारे आणि त्यांची पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान संजय संसारे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्यामुळेच संजय संसारे यांचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईक आणि समर्थकांनी रुग्णालयात गर्दी केली. यावेळी मनमाड शहरातील सत्ताधारी गटाचे (शिंदे सेना) नगरसेवक विशाल राजेंद्र आहिरे हे त्यांच्या काही साथीदारांसह रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांशी वाद घालत असताना अचानक या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. नगरसेवक विशाल आहिरे आणि त्यांच्या समर्थकांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील साहित्याचीही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. रुग्णालयात झालेल्या या बेदम मारहाणीचा आणि गोंधळाचा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे मनमाडमधील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नगरसेवकासह साथीदारांवर गुन्हे दाखल याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी फिर्यादी डॉ. योगीराज हरिशचंद्र शिंदे यांनी पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी नगरसेवक विशाल राजेंद्र आहिरे आणि प्रमोद आहिरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे:भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: १२१, १३२, ११५ (२), ३५२, ३५विशेष कायदा: महाराष्ट्र वैद्यकीय सेवाव्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१० चे कलम ४ या घटनेमुळे मनमाड शहरात मोठी खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande