
पुणे, 08 जून (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधनातील आणि एकूण समाजासाठीच्या योगदानाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “विद्यापीठाचे संशोधन नेमके समाजोपयोगी किती आहे?” असा मुद्दा पुढे आला असून राज्यातील सर्वच सरकारी विद्यापीठांच्या संशोधन गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.
विद्यापीठांमधील संशोधन हे बहुतांश वेळा शैक्षणिक आणि सामाजिक विषयांपुरते मर्यादित राहते. अनेकदा हे संशोधन पीएच.डी पदवी मिळविणे, शोधनिबंध सादर करणे, संशोधन प्रकल्प पूर्ण करून निधी किंवा फेलोशिप मिळविणे यापुरतेच सीमित असल्याची टीका यानिमित्ताने होत आहे. त्यामुळे या संशोधनाचा थेट समाज विकास किंवा औद्योगिक उपयोग किती होतो, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुसरीकडे, विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन आणि त्याचा प्रत्यक्ष समाजावर होणारा परिणाम तपासण्यासाठी ठोस आणि प्रभावी यंत्रणा नसल्याचेही तज्ज्ञांकडून नमूद केले जात आहे. त्यामुळे संशोधनाची दिशा, त्याची उपयुक्तता आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग यावर अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यानंतर हा मुद्दा अधिक तीव्र झाला असून, विद्यापीठीय संशोधनाची भूमिका, उद्दिष्टे आणि परिणामकारकता यावर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु