
सोलापूर, 08 जून (हिं.स.)।सोलापूर वादळी वाऱ्यामुळे वाघोली, वाफेगाव, बाबळगाव, संगम, गणेशगाव, तांबवे आणि लवंग परिसरातील सुमारे ३५० ते ४०० एकरांवरील विक्रीस तयार असलेले केळी पीक जमीनदोस्त झाले आहे. घडांच्या वजनामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.पूर्व भागातील या सहा-सात गावांमध्ये अंदाजे तीन ते चार हजार एकरांवर केळीची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे ३०० ते ४०० एकरांवरील पीक काढणीसाठी पूर्णपणे तयार होते. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून केळीला चांगला बाजारभाव मिळत होता. बॉक्स पॅकिंगसाठी प्रतिकिलो २२ ते २५ रुपये, तर कॅरेट पॅकिंगसाठी १५ ते १७ रुपये दर मिळत असल्याने उत्पादकांना चांगला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा होती. मात्र, काढणीच्या तोंडावरच आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून कर्जबाजारीपणाचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड