
सोलापूर, 08 जून (हिं.स.) : शेती आणि घरगुती वीज कनेक्शन एकाच फीडरवर असलेल्या गावांमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. या काळात अनेक ठिकाणी सिंगल फेजवर कृषीपंप जोडणे तसेच तारांवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे प्रकार वाढल्याचे ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, अशा गावांमध्ये वीज चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळाल्याशिवाय लोडशेडिंग पूर्णपणे थांबवता येणार नाही. त्यामुळे वीज व्यवस्थापन सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे.‘महावितरण’कडून ग्रामीण भागात ‘आरडीएसएस’ योजना राबवली जात असून त्याअंतर्गत वीज बिलिंग अधिक अचूक करण्यासाठी आणि वीज गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच नवीन उपकेंद्रे उभारणे, ट्रान्सफॉर्मर बसवणे आणि जुन्या वीज वाहिन्यांचे नूतनीकरण अशी पायाभूत सुधारणा कामेही केली जात आहेत.शेतकऱ्यांना दिवसा स्वतंत्र आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी कृषी फीडरचे विलगीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही गावांमध्ये या प्रकल्पांना विरोध झाल्यामुळे कामात अडथळे आले होते. अनेकांनी जमिनीत वीज खांब उभारण्यास नकार दिला होता. आता मात्र वीज कपातीचा फटका बसू लागल्याने अनेक गावांकडून या कामांना सहकार्य करण्याची मागणी होत आहे.महावितरणने स्पष्ट केले आहे की, शेती आणि घरगुती वीज फीडर वेगळे केल्यानंतर गावांचा वीजपुरवठा २४ तास सुरळीत होऊ शकतो. मात्र ज्या गावांमध्ये वीज चोरी आणि गळती कायम राहील, तेथे उन्हाळा असो वा पावसाळा, लोडशेडिंग सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड