
परभणी, 08 जून (हिं.स.)।
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क डॉ. राजेश देशमुख तसेच संचालक, अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात आली आहे. विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड विभाग बी. एच. तडवी तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी २९ मे २०२६ ते ४ जून २०२६ या कालावधीत जिल्हाभर विशेष मोहीम राबवून अवैध मद्य व्यवसायांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत एकूण ६६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ६५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ४ लाख ६२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कारवाईदरम्यान ३ वाहने जप्त करण्यात आली असून ११३.९४ ब. लिटर देशी दारू, १६.२ ब. लिटर विदेशी दारू, ५२५ ब. लिटर गावठी दारू/हातभट्टी, १०० ब. लिटर ताडी तसेच २ हजार ८०० लिटर रसायन (हातभट्टी निर्मितीसाठीचे कच्चे साहित्य) असा मोठ्या प्रमाणावर साठा हस्तगत करण्यात आला आहे.अवैध मद्य व्यवसायांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी विभागाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ९३ अन्वये ५ प्रतिबंधात्मक प्रस्ताव देखील सादर केले आहेत. यापुढेही जिल्ह्यात अशा प्रकारच्या धडक मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारी अवैध, बनावट अथवा परराज्यातील दारू खरेदी करू नये. जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर मद्यनिर्मिती अथवा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर तात्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis