लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
रेणापूरमध्ये सर्वाधिक ५७.६ मिमी पावसाची नोंद लातूर, 08 जून (हिं.स.) : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली असून ८ जून २०२६ रोजी सकाळी १०.०८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी ४१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आ
आला पाऊस


रेणापूरमध्ये सर्वाधिक ५७.६ मिमी पावसाची नोंद

लातूर, 08 जून (हिं.स.) : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली असून ८ जून २०२६ रोजी सकाळी १०.०८ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार जिल्ह्यात सरासरी ४१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत हे प्रमाण ३०.७ टक्के इतके आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांपैकी रेणापूर तालुक्यात सर्वाधिक ५७.६ मिमी पावसाची नोंद झाली असून तेथील पर्जन्यमानाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्याखालोखाल जालकोट तालुक्यात ६४.८ मिमी पाऊस नोंदविला गेला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६३.८ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. औसा तालुक्यात ४७.४ मिमी, उदगीरमध्ये ४६.६ मिमी आणि निलंगा तालुक्यात ४३.७ मिमी पाऊस झाला आहे.

लातूर तालुक्यात ४२.३ मिमी पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीच्या २९.६ टक्के आहे. अहमदपूर तालुक्यात ३२.२ मिमी, देवणीमध्ये २८.४ मिमी तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात २१ मिमी पाऊस झाला आहे. चाकूर तालुक्यात तुलनेने कमी म्हणजे १४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाबरोबरच जिल्ह्यातील पावसाळी दिवसांची संख्याही वाढली आहे. लातूर, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांत प्रत्येकी पाच पावसाळी दिवसांची नोंद झाली असून अहमदपूर, निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ येथे चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३५.४ मिमी असून आतापर्यंत ४१.६ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर विभागाची सरासरी २८.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून विभागीय पातळीवर पर्जन्यमानाचे प्रमाण २१ टक्के आहे.

कृषी विभागाच्या दृष्टीने ही पावसाची स्थिती समाधानकारक मानली जात असली तरी शेतकऱ्यांनी पुरेसा व नियमित पाऊस झाल्यानंतरच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीनुसार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तालुकानिहाय पर्जन्यमान (मिमीमध्ये):

- रेणापूर – ५७.६

- जालकोट – ६४.८

- औसा – ४७.४

- उदगीर – ४६.६

- निलंगा – ४३.७

- लातूर – ४२.३

- अहमदपूर – ३२.२

- देवणी – २८.४

- शिरूर अनंतपाळ – २१.०

- चाकूर – १४.७

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande