
परभणी, 08 जून (हिं.स.)।
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये मतदार याद्यांची अचूकता, पारदर्शकता तसेच निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याची सूचना केली. मतदार याद्यांची शुद्धता व विश्वासार्हता राखण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी प्रशिक्षणातील मुद्द्यांचे सविस्तर विवेचन करताना बीएलओ व संबंधित अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे अचूक पालन करून कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.प्रशिक्षणास मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ सुपरवायझर तसेच मास्टर ट्रेनर बीएलओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मतदार यादी अद्ययावत करणे, नवमतदार नोंदणी, नाव वगळणे, दुरुस्ती प्रक्रिया, घरभेटीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis