
लातूर, 08 जून (हिं.स.)।भारतीय जनगणना २०२६-२७ मध्ये धर्म व जातीची नोंद कशा पद्धतीने करावी, बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वरांचा बाराव्या शतकातील मूळ अनुभवमंडप व परशूकट्टा पर्यटकांसाठी खुला करावा तसेच महात्मा बसवेश्वर यांची जयंती देशभर शासकीय स्तरावर साजरी करावी या प्रमुख मागण्यांसह विविध समाजहिताच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीने वीरशैव लिंगायत गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत भक्तीस्थळ राजूर (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांवर गेली तीन दशके शिवा संघटना देशभरात कार्यरत असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात संघटनेने पुढाकार घेतला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
परिषदेमध्ये जनगणना २०२६-२७ मध्ये वीरशैव लिंगायत समाजाने धर्म व जातीची नोंद कशा प्रकारे करावी याबाबत सविस्तर चर्चा होऊन एकमताने निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच बसवकल्याण येथील अनुभवमंडप व परशूकट्टा मुक्त करून जागतिक पर्यटकांसाठी खुला करण्याबाबत आणि क्रांतीसूर्य जगज्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती देशभर शासकीय स्तरावर साजरी करण्याच्या मागणीवरही विचारमंथन होणार आहे.
या परिषदेस पंचाचार्य परंपरा व विरक्त परंपरेतील सुमारे १०० मठाधिपती, २०० शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक, शिवा संघटनेचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकारी, साहित्यिक, अभ्यासक तसेच समाजबांधव उपस्थित राहणार असून सुमारे ५०० प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील मठाधिपती, शिवकीर्तनकार, प्रवचनकार, गायक-वादक, साहित्यिक, अभ्यासक, शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि वीरशैव-लिंगायत समाजबांधवांनी या गोलमेज परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis