
लातूर, 08 जून (हिं.स.)।
लातूर शहरातील मुख्य वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या सम्राट चौक ते गुळ मार्केट मार्गावर भीषण अपघात घडला. एका भरधाव खाजगी बसच्या चाकाखाली चिरडून एका तरुण युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून, दृश्य अत्यंत विदारक होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आझाद हॉटेलजवळून एक खाजगी बस मार्गक्रमण करत होती. यावेळी बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीस्वार युवकाला या बसने जोरदार धडक दिली. धडकेनंतर बस थांबण्याऐवजी पुढे गेल्याने सदर तरुण बसच्या चाकाखाली आला. चाक अंगावरून गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव अरबाज शेख असुन तो ड्रायव्हर कॉलनी, जिनत सोसायटी प्रभाग क्र ०३ परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शहरात अवजड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेश बंदी असतानाही, वाहतूक पोलिसांच्या डोळ्यावर धूळ फेकून राजरोसपणे खाजगी बसेस आणि अवजड वाहने शहराच्या मध्यवर्ती भागातून धावत आहेत. या नियमावलीची पायमल्ली होत असल्यामुळेच आज एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
शहरातील ट्रॅफिकचे नियम धाब्यावर बसवून ही अवजड वाहने शहराच्या आत कशी येतात? त्यांना कोणाचा वरदहस्त आहे? का प्रशासनाचे अपयश या अपघाताला कारणीभूत आहे? असे संतप्त प्रश्न आता लातूरकर उपस्थित करत आहेत. या अपघाताला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करून आता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, संबंधित बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis