

रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) । केंद्र सरकारच्या RAMP (Raising and Accelerating MSME Performance) उपक्रमांतर्गत, महाराष्ट्र शासन, एमएसएसआयडीसी आणि झेप उद्योगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व पुरुष उद्योजकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष एमएसएमई व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमात ८३ उद्योजकांनी सहभाग घेतला.
हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील महिला व पुरुष उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार इच्छुक तरुण-तरुणी तसेच विविध उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
उद्योजकांना एमएसएमई क्षेत्रातील विविध शासकीय योजना, वित्तीय सहाय्य, सरकारी खरेदी प्रक्रिया, जीईएम पोर्टल, एनएसआयसी योजना, बँकिंग सुविधा, पॅकेजिंगचे महत्त्व आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूर्णिमा शिरीषकर यांनी महाराष्ट्र शासनांतर्गत एमएसएमई क्षेत्रासाठी उपलब्ध सवलती, अनुदाने आणि विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
विवेक शिंदे यांनी शासकीय निविदा प्रक्रिया, जीईएम पोर्टल आणि सरकारी खरेदीमधील व्यवसाय संधी यावर मार्गदर्शन केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंगचे सहसंचालक डॉ. सुबोध जुईकर यांनी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान, उत्पादन मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी पॅकेजिंगचे महत्त्व स्पष्ट केले.
इकबाल अन्सारी यांनी एनएसआयसीच्या विविध योजना, एससी/एसटी हब उपक्रम तसेच उद्योजकांसाठी उपलब्ध सहाय्य व अनुदान योजनांची माहिती दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक माधुरी नाईक यांनी MSME उद्योगांसाठी उपलब्ध बँक कर्ज योजना, वित्तपुरवठा आणि आर्थिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासन जिल्हा उद्योग केंद्र विभागाचेच अक्षय साळुंखे यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, कर्ज आणि अनुदनाची योजना समजावली.
कार्यक्रमादरम्यान सहभागी उद्योजकांनी विविध विषयांवर प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. उपस्थित उद्योजकांनी कार्यक्रम अत्यंत उपयुक्त व ज्ञानवर्धक ठरल्याचे मत व्यक्त केले.
झेप उद्योगिनी, एमएसएसआयडीसी आणि RAMP उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यातही उद्योजकांसाठी अशा प्रकारचे क्षमता विकास व व्यवसाय वृद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी