
नांदेड, 08 जून (हिं.स.)।
बीड जिल्हा प्रशासनाकडून पाणंद रस्ते मोकळे करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे काळेगाव हवेली (ता. बीड) येथे घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. पाणंद रस्ता मोकळा करण्याच्या कामातून निर्माण झालेल्या वादातून एका महिलेसह शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली.
काळेगाव हवेली येथील कुंभार वस्तीवरील गट क्रमांक ४२२ व ४२३ मधील शेतरस्ता तहसील प्रशासन व भूमी अभिलेख विभागाने मोकळा करून दिला होता. मात्र त्यावेळी काही व्यक्तींनी रस्ता कामाला विरोध करत महसूल कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप आहे. याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जखमींना फिर्याद नोंदविण्यासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जिल्हा रुग्णालय, बीड येथे पाठविल्याची माहिती मिळाली आहे.
डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनावर टीका करत म्हटले की, महसूल व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमोरच रस्ता कामाला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी संबंधितांवर कारवाई झाली असती तर घटना घडली नसती. शेतरस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या सरकारी मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis