अकोला येथे जन्म-मृत्यू नोंदणी सेवा ठप्प; १,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित
अकोला, 09 जून (हिं.स.) : जन्म व मृत्यू नोंदणीसारखी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक शासकीय सेवा मागील २५ मेपासून ठप्प पडल्याने अकोलेकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील जन्म-मृत्यू नोंदणी पोर्टल
अकोला येथे जन्म-मृत्यू नोंदणी सेवा ठप्प; १,५०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित


अकोला, 09 जून (हिं.स.) : जन्म व मृत्यू नोंदणीसारखी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक शासकीय सेवा मागील २५ मेपासून ठप्प पडल्याने अकोलेकरांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारितील जन्म-मृत्यू नोंदणी पोर्टल बंद असल्यामुळे अकोला महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून सुमारे १,५०० हून अधिक दाखल्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव यांनी अकोला महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून ठप्प पडलेली यंत्रणा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित असलेली सेवा दीर्घकाळ बंद राहणे हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनानुसार, २५ मेपूर्वी वापरण्यात येणाऱ्या जुन्या पोर्टलवर सातत्याने लॅगिंग, सर्व्हर डाऊन होणे, माहिती अपलोड न होणे तसेच डेटा सेव्ह न होण्यासारख्या तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिक दोघांनाही वारंवार त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर नवीन एकात्मिक पोर्टल प्रणाली सुरू करण्यात आली; मात्र त्यामध्ये निर्माण झालेल्या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्था ठप्प झाली आहे.

महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून समस्या निदर्शनास आणून दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याने शाळा प्रवेश, शासकीय योजनांचा लाभ, आधार कार्ड, पासपोर्ट तसेच बँकिंग व्यवहार यांसारखी अनेक कामे रखडली आहेत. तर मृत्यू दाखल्याअभावी वारस नोंदणी, विमा दावे, बँक खात्यांशी संबंधित प्रक्रिया आणि विविध कायदेशीर कामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत.

नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता संबंधित पोर्टलमधील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून जन्म-मृत्यू नोंदणी सेवा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande