वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती द्या; समन्वयाने काम करा : जिल्हाधिकारी
अकोला, 09 जून (हिं.स.) : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात अकोला जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित जमीन
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती द्या; समन्वयाने काम करा : जिल्हाधिकारी


अकोला, 09 जून (हिं.स.) : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात अकोला जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार असून शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित जमीन संपादन, विविध मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, मृद व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, पाटबंधारे विभागाचे चिन्मय वाकोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की, प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात. प्रकल्पाच्या टप्पा-२ आणि टप्पा-३ अंतर्गत प्रस्तावित कालवा अकोला जिल्ह्यातून जात असल्याने कामांना गती देण्याची गरज आहे.

प्रकल्पाच्या टप्पा-२ मध्ये निम्न वर्धा जलाशय ते काटेपूर्णा जलाशय दरम्यान 126.945 किलोमीटर लांबीचा कालवा प्रस्तावित असून, टप्पा-३ मध्ये काटेपूर्णा जलाशय ते नळगंगा जलाशय दरम्यान 109 किलोमीटरचा दुवा कालवा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पावसावर अवलंबून असलेली शेती अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून शेती, पशुपालन आणि संबंधित व्यवसायांना चालना मिळणार आहे. तसेच उद्योगधंद्यांच्या विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पांतर्गत मुख्य कालव्याची एकूण लांबी 388.28 किलोमीटर असून, 4 लाख 4 हजार 281 हेक्टर लाभ क्षेत्र आणि 6 लाख 11 हजार 150 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 94 हजार 967 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूंना एकूण 50 धरणांचा प्रस्ताव असून त्यामध्ये 32 नवीन धरणांचा समावेश आहे. तसेच विद्यमान 18 धरणांपैकी 10 धरणांची उंची वाढविण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोला आणि बार्शिटाकळी तालुक्यांतील अनेक गावे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट आहेत.

बैठकीत प्रकल्पाच्या विविध टप्प्यांतील कामांचा आढावा घेण्यात आला तसेच संबंधित विभागांना वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande