
रायगड, 09 जून (हिं.स.)। : विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेला शैक्षणिक ताण, भावनिक समस्या, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे.
मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील युवक-युवतींसाठी हा कार्यक्रम रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाची मोठी संधी ठरणार आहे.या उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (एमआयएमएच), पुणे ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार असून प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, प्रशिक्षण पद्धती, पर्यवेक्षण आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी संस्थेकडे असेल.
अमृत मानसमित्र कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पालक-शिक्षक समन्वय तसेच मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन यांचा समावेश असेल.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वयंरोजगाराच्या माध्यमातून समुपदेशन सेवा देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड (ऑफलाइन व ऑनलाइन) असेल. १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक बॅचमध्ये २० ते ३० उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे.
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) ही शैक्षणिक पात्रता असलेले आणि अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार अर्ज करू शकतात. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत केला जाणार असून पात्र उमेदवारांना हे प्रशिक्षण मोफत उपलब्ध होणार आहे.
पहिल्या बॅचसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. पात्र उमेदवारांना ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. छाननीनंतर पात्र उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे माहिती देण्यात येणार आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी अमृत रायगड जिल्हा कार्यालय, कलेक्टर कार्यालय परिसर, अलिबाग येथे संपर्क साधता येणार असून संपर्क क्रमांक ९११२२२८७५९ असा आहे. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ: (https://mahaamrut.org.in/ )
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)