
नांदेड, 9 जून, (हिं.स.)। पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावल्याने खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून, बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पावसाच्या आगमनानंतर पेरणीपूर्व तयारीसाठी सक्रिय झाले आहेत. शहरातील विविध कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विविध पिकांच्या बियाण्यांची तसेच रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकरी रांगा लावून उभे खरीप हंगामाच्या तयारीला वेग असल्याचे चित्र दिसून आले. यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने शेतकरी खरीप हंगामाबाबत आशावादी आहेत. कृषी सेवा केंद्रांवर वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच खते व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
दरम्यान, हवामान अनुकूल राहिल्यास येत्या काही दिवसांत पेरण्यांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तालुक्यातील कृषी बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis