
परभणी, 09 जून (हिं.स.) : इबोला हा अत्यंत गंभीर आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार असून त्याचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, इबोलाची लक्षणे अचानक ताप येणे, अशक्तपणा, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, डोकेदुखी, घशात खवखव, उलटी, जुलाब आणि तीव्र पोटदुखी अशी आहेत. काही गंभीर रुग्णांमध्ये अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्त्राव होण्याची शक्यता देखील असते.
हा आजार श्वसनाद्वारे पसरत नाही, तर केवळ संक्रमित व्यक्तीच्या रक्त, लाळ, घाम, उलटी, मलमूत्र किंवा इतर शारीरिक द्रवांच्या थेट संपर्कातून पसरतो. तसेच संक्रमित व्यक्तीच्या वस्तूंना स्पर्श केल्यासही संसर्ग होऊ शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाय:-
नागरिकांनी साबणाने वारंवार हात धुवावेत, वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी, संशयित रुग्णांच्या थेट संपर्कात येणे टाळावे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. ताप, उलटी किंवा रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
सध्या काही आफ्रिकी देशांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव आढळून आला असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, केवळ अधिकृत आरोग्य विभागाच्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांनी केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis