
चंद्रपूर, 09 जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर दिवसा शेतकामात व्यस्त असलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधता यावा यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सोमवारी (दि. 8) रात्री थेट गावभेट दौरा करत नागरिकांशी संवाद साधला.
पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या बोर्डा, घंटाचौकी आणि वलनी या गावांना भेट देत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच विविध शासकीय योजनांची माहिती दिली.घंटाचौकी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीला भेट देऊन शिक्षण व बालविकास उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. शाळा व अंगणवाडीस आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.महिला बचत गटांशी संवाद साधत महिलांना स्वावलंबन, उद्योजकता आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
वलनी येथे पाणीपुरवठा योजना, कृषी व संलग्न व्यवसाय तसेच उपजीविका विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बोर्डा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि सार्वजनिक वाचनालयाची पाहणी करून आरोग्य सुविधा व वाचन संस्कृती वाढविण्यावर भर देण्यात आला.या दौऱ्यात सरपंच, उपसरपंच तसेच विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकसंवाद अभियानामुळे प्रशासन व नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होत असून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव