
चंद्रपूर, 09 जून (हिं.स.) - चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातून वर्धा नदीत पोहायला गेलेले पाच तरुण बुडाले असून त्यापैकी तिघांचा मृतदेह सापडला आहे तर दोघे अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे सर्व युवकांचे वय १५ ते २० वर्षांच्या वर्षांच्या वयोगटातील असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घुग्गुस येथील इंदिरा नगर परिसरात राहणारे पाच तरुण पोहण्यासाठी चांदूर गावाजवळील वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान नदीकाठी तरुणांचे कपडे आणि मोबाईल फोन आढळून आल्याने ते नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान बचाव पथकाला पाचपैकी तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र उर्वरित दोन तरुणांचा अद्याप शोध लागलेला नसून शोधकार्य सुरू आहे.
बुडालेल्या तरुणांची नावे सम्यक देवराव सोनटक्के (१८), संनी अशोक आस्मपेल्ली (१९), रोहित बाबाराव बोबडे (१९), शिव भास्कर केलझरकर (१९) आणि तन्मय नवनाथ पथाडे (१८) अशी आहेत. हे सर्व युवक घुग्गुस शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, उर्वरित दोन युवकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदी परिसरात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव