निलंगा तालुक्यात थकीत ऊस बिलांवरून शेतकऱ्यांचा संताप; आत्मदहन आंदोलनाचा इशारा
लातूर, ९ जून (हिं.स.) : निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावीत, अन्यथा १२ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके या
इशारा


लातूर, ९ जून (हिं.स.) : निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले तात्काळ अदा करावीत, अन्यथा १२ जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी दिला आहे.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी, निलंगा यांना सोमवारी (दि. ८ जून) निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला होता. मात्र मागील सहा महिन्यांपासून ऊस बिलांची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.

थकीत बिलांमुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले असून, अनेक शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तसेच शेती व शैक्षणिक खर्चासाठी सावकारी तसेच बँकांकडून कर्ज घ्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या खरीप हंगामातील पेरणी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च आणि इतर आवश्यक गरजांसाठी निधीची तातडीने आवश्यकता असताना साखर कारखान्यांच्या विलंबामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

थकीत ऊस बिले पुढील चार दिवसांत अदा करावीत तसेच संबंधित कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १२ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती साखर आयुक्त, सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, निलंगा मतदारसंघाचे आमदार आणि निलंगा पोलिस ठाण्यालाही पाठविण्यात आल्या आहेत.

या वेळी तुळशीदास साळुंके यांच्यासह माधव बालुरे पाटील, बालाजी सूर्यवंशी, बबन चामे, चंद्रकांत पवार, गोविंद पवार, बाबुराव मोहिते, नामदेव चामे, मोहन पिंड, किशोर तोरखडे, नेताजी पाटील, संजय पवार, सुभाष पाटील, वामन सूर्यवंशी, शिवदास जाधव, मारुती जाधव तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande