
रायगड, 09 जून (हिं.स.) : शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत प्रथमच नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) आणि असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात निवडलेल्या घटकांच्या सर्वेक्षणासाठी घरी भेट देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने केले आहे.
या सर्वेक्षणासाठी नियुक्त अन्वेषक व पर्यवेक्षकांच्या प्रशिक्षणासाठी पुणे व कोकण विभागाची विभागीय कार्यशाळा 5 ते 10 जून 2026 दरम्यान राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाच्या आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी, पुणे गजानन पाटील यांनी ऑनलाइन संदेशाद्वारे सांगितले की या सर्वेक्षणातून मिळणारी माहिती ग्राम, जिल्हा आणि विभागस्तरीय विकास योजना तसेच धोरणनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सर्वेक्षण यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
PLFS सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, कामगार सहभाग दर तसेच उद्योगनिहाय रोजगाराची माहिती संकलित केली जाणार आहे. तर ASUSE सर्वेक्षणातून असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या, स्वरूप, आर्थिक स्थिती, रोजगारनिर्मिती आणि उत्पन्न-खर्च यासंबंधी सविस्तर माहिती मिळणार आहे.
राज्यात एकूण 6,828 नमुना घटकांची निवड करण्यात आली असून 276 अन्वेषक व निरीक्षकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. पुणे आणि कोकण विभागात मिळून 2,956 नमुना घटकांचे सर्वेक्षण 75 अन्वेषक व 28 पर्यवेक्षकांमार्फत करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणातून मिळणारी अचूक व अद्ययावत सांख्यिकीय माहिती शासनाच्या विकास योजना, रोजगार धोरणे आणि आर्थिक नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)