रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालयाने माझा जीवनपट बदलला – डॉ.श्रीरंग कद्रेकर
रत्नागिरी, 9 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने आपले जीवन आमूलाग्र बदलल्याचे सांगून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी आज वाचनालयाला नव्या बांधकामासाठी दोन लाख रुपयांची देणगी दिली. डॉ. कद्रेकर यांनी वाचनालयाव
दीपक पटवर्धन श्रीरंग कद्रेकर


रत्नागिरी, 9 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने आपले जीवन आमूलाग्र बदलल्याचे सांगून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी आज वाचनालयाला नव्या बांधकामासाठी दोन लाख रुपयांची देणगी दिली.

डॉ. कद्रेकर यांनी वाचनालयाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांचे वडील वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी येत. टाइम्स ऑफ इंडियामधील जाहिरात वाचून पुढील शिक्षणासाठी डॉ. कद्रेकरांना वडिलांनी मुंबईला पाठवले. वृत्तपत्रातील ती शैक्षणिक जाहिरात आपल्या जीवनाला नवीन दिशा देऊन गेली. ती जाहिरात वाचून वडिलांनी मला मुंबईत पाठवले व नवीन शैक्षणिक दिशा मिळाली. त्याकाळी आर्थिक स्थिती फार बिकट होती. पेपर विकत घेऊन वाचण्याची स्थिती नव्हती. या वाचनालयामुळे ते वृत्तपत्र वडिलांच्या वाचनात आले आणि माझे जीवन आमूलाग्र बदलले अशी भावोत्कट आठवण डॉ. कद्रेकर यांनी सांगितली.

अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांना ते म्हणाले की, तुम्ही वाचनालयासाठी जे उत्तम काम करत आहात त्यात सहयोग द्यावा आणि आपल्या जुन्या आठवणी या वाचनालयाचे ऋण याबाबत कृतज्ञतापूर्वक दोन लाखाचा धनादेश देत आहे.

या भावोत्तकट क्षणी वाचनालयाचे अध्यक्ष पटवर्धन डॉ. कद्रेकर यांच्यासमोर नतमस्तक झाले. आपला आशीर्वाद, आपला आधार हे मला व्यक्तिगत नेहमीच भरभरून लाभले. आपण वाचनालयाला देत असलेले हे योगदान आणि आपण मुक्त वाचन विभागासंदर्भात सांगितलेला हा क्षण वाचनालय जपून ठेवेल आणि वाचनालयाचा मुक्त वाचन विभाग अधिक सुसज्ज करेल. आपला हा प्रेरणादायी अनुभव सतत स्मरणात राहावा म्हणून रचना करेल, असे सांगत ॲड. पटवर्धन यांनी डॉ.कद्रेकर यांनी दिलेला धनादेश स्वीकारला. आपले आशीर्वाद असेच पाठराखण करीत राहावेत व त्यातून रचनात्मक काम अग्रेसर होत रहावे. तुम्ही दिलेली ही ऊर्जा सतत प्रेरणा देत राहावी, अशा भावना ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande