
छत्रपती संभाजीनगर, ९ जून (हिं.स.) : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग क्षेत्रातील सदस्यांसाठी विशेष ग्राहक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार, १० जून रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल अतिथी, पी-३, जालना रोड, सेव्हन हिल्स, टाऊन सेंटर येथे होणार आहे.
TRAI चे प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरू येथील अधिकारी के. मुरलीधरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील ग्राहक हक्क, डिजिटल सुरक्षा आणि सायबर गुन्हे प्रतिबंध याविषयी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
संसदेच्या कायद्याद्वारे १९९७ मध्ये स्थापन झालेली TRAI ही वैधानिक संस्था असून दूरसंचार व प्रसारण सेवांचे नियमन करण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. ग्राहकांच्या हितांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने TRAI देशभरात नियमितपणे ग्राहक संपर्क व जनजागृती कार्यक्रम आयोजित करत असते.
या कार्यशाळेत दूरसंचार सेवांमधील ग्राहकांचे हक्क, सेवा गुणवत्तेची (QoS) मानके, तक्रार निवारण यंत्रणा, डिजिटल सुरक्षा, दूरसंचार नेटवर्कचा सुरक्षित वापर, नियामक ‘करावे आणि करू नयेत’ (Do’s & Don’ts) तसेच सायबर गुन्हे प्रतिबंध या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
CII परिसंस्थेतील उद्योगपती, व्यावसायिक नेते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तज्ज्ञ आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्यांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता आणि सुरक्षिततेचे संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा TRAI चा प्रयत्न असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी के. मुरलीधरा यांच्याशी ९४४९००५५८८ या क्रमांकावर किंवा sro2.bengaluru@trai.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis