नांदेड परिक्षेत्रात गुटखाविरोधी धडक मोहीम; 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 09 जून, (हिं.स.)। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये व्यापक कारवाई करण्यात
अ


नांदेड, 09 जून, (हिं.स.)। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये व्यापक कारवाई करण्यात आली. या कालावधीत भारतीय न्याय संहिता कलम 123 अंतर्गत गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात एकूण 30 गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत नांदेड जिल्ह्यात 11, परभणी जिल्ह्यात 9, हिंगोली जिल्ह्यात 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एकूण 48 आरोपींविरुद्ध कारवाई करत 67 लाख 2 हजार 671 रुपयांचा गुटखा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मोहीमेअंतर्गत नांदेड परिक्षेत्रातील एकूण 2 हजार 702 पानटपऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात 530, परभणी जिल्ह्यात 839, हिंगोली जिल्ह्यात 724 आणि लातूर जिल्ह्यात 609 पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हानिहाय जप्त मुद्देमालामध्ये नांदेडमध्ये 25 लाख 21 हजार 741 रुपये, परभणीत 12 लाख 64 हजार 43 रुपये, हिंगोलीत 1 लाख 69 हजार 531 रुपये आणि लातूरमध्ये 27 लाख 47 हजार 356 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पानटपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच अमली पदार्थांच्या साठवणूक व विक्रीच्या संशयित ठिकाणांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, नागरिकांकडून अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील गुटखा, अंमली पदार्थ व इतर अवैध व्यवसायांची माहिती या क्रमांकावर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande