
सोलापूर, 09 जून (हिं.स.)महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०७ मे २०२६ अन्वये, केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याची नवीन कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे.राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा रुपये १ हजार ५०० अर्थसहाय्य थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) वितरित केले जाते. या योजनांचा लाभ निरंतर सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना दरवर्षी 'हयात प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
तरी 'हयात प्रमाणपत्र' सादर करण्यास लाभार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर आता BSA (Beneficiary Satyapan App) हे ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी आपल्या मोबाईलवर 'गूगल प्ले स्टोअर' वरून BSA आणि Aadhar Face RD हे दोन अॅप्स डाऊनलोड करणे आवश्यक आहे. सदर अॅपमध्ये आधार क्रमांक व मोबाईल ओटीपीद्वारे नोंदणी करून लाभार्थ्यांना चेहरा ओळख (Face Capture) किंवा बोटांच्या ठशांद्वारे (Fingerprint) घरबसल्या पडताळणी पूर्ण करता येईल. लाभार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नसल्यास, ते गावातील तलाठी, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत हयात प्रमाणपत्र सादर करू शकतात.
लाभार्थ्यांनी स्वतः मोबाईलद्वारे ही प्रक्रिया केल्यास ती पूर्णतः मोफत आहे. मात्र, सेतू किंवा नागरी सेवा केंद्रांमार्फत ही सेवा घेतल्यास कमाल रुपये ५० इतके सेवा शुल्क देय राहील. वृद्ध व दिव्यांग लाभार्थ्यांच्या सोयीसाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत 'डोअरस्टेप' (Doorstep) पडताळणीची मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या ऑनलाईन प्रणालीचा लाभ घेऊन विहित मुदतीत आपले हयात प्रमाणपत्रे BSA ॲप मधून तयार करून घ्यावीत व सदर हयात प्रमाणपत्र कार्यालयास सादर करावीत, जेणेकरून तांत्रिक कारणास्तव लाभ बंद होणार नाही. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपले हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही, त्यांनी तातडीने BSA (Beneficiary Satyapan App) आणि Aadhar Face RD या ॲपचा वापर करून किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र येथे आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तहसीलदार उत्तर सोलापूर निलेश पाटील यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड