बनावट तलाठी नियुक्ती आदेशांपासून सावध राहा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, ९ जून (हिं.स.) : जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींकडून भूलथापा देऊन तलाठी निवडीचे बनावट आदेश देत फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अशा बनावट आदेशांना बळी न पडण्याचे आवाहन केले
बनावट तलाठी नियुक्ती आदेशांपासून सावध राहा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन


छत्रपती संभाजीनगर, ९ जून (हिं.स.) : जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींकडून भूलथापा देऊन तलाठी निवडीचे बनावट आदेश देत फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अशा बनावट आदेशांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त, अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे आणि टीसीएस कंपनीमार्फत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) भरती २०२३ साठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२३ दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवड समितीसाठी १५४ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. निवड व प्रतीक्षा यादीत एकूण १५३ उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी १४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असून, याशिवाय कोणालाही ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदासाठी नियुक्ती आदेश देण्यात आलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तलाठी भरती २०२३ प्रक्रियेची मुदत संपलेली असल्याने नागरिकांनी अज्ञात व्यक्तींच्या आमिषांना किंवा खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तलाठी भरतीसंदर्भातील वस्तुनिष्ठ माहिती मिळविण्यासाठी किंवा तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी अभिप्राय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा. यासाठी ०२४०-२९८८०७७ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande