
रत्नागिरी, 8 जून (हिं.स.) ।रत्नागिरी जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण किमान दहा टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेनुसार झीरो अॅक्सिडेंट ड्राइव्ह ही विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान दिनांक 01 जून 2026 ते 08 जून 2026 या कालावधीत वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती तसेच विविध संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अपघात प्रतिबंधासाठी व्यापक उपाययोजना करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध 401 गुन्हे नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या १७३ वाहन चालकांविरुद्ध गुन्हे करण्यात आले. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन धारकांविरुद्ध 162 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन 10 चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृतीपर उपक्रम तसेच नागरिकांमध्ये संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) तसेच संबंधित विभागांशी विशेष समन्वय साधण्यात आला आहे. त्यानुसार संभाव्य अपघात क्षेत्र व संवेदनशील ठिकाणी सूचना फलक, वेगमर्यादा फलक व दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. विशेषतः हातखंबा (रत्नागिरी) तसेच भोस्ते घाट (खेड) येथे आवश्यक वाहतूक सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महामार्ग व प्रमुख मार्गावर वाहनांचा वेग नियंत्रित राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स (Rumble Strips) बसविण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत रस्ते सुरक्षेला प्राधान्य देऊन झीरो ॲक्सिडेंट ड्राइव्हअंतर्गत येत्या काळातही अशाच प्रभावी कारवाया, जनजागृती कार्यक्रम व समन्वयात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, वेगमर्यादांचे पालन करावे, दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्ते अपघातमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी