नांदेडच्या मासे बाजारात खवय्यांची गर्दी
नांदेड, 09 जून (हिं.स.)। वरुणराजाच्या पहिल्याच दमदार बरसातीने नांदेडकरांच्या ताटात मृग नक्षत्राचा स्वादिष्ट मुहूर्त घेऊन प्रवेश केला आहे. मृगाचे आगमन होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने शहरातील मासे बाजारपेठा अक्षरशः खवय्यांनी फुलून गेल्या. मर
नांदेडच्या मासे बाजारात खवय्यांची गर्दी


नांदेड, 09 जून (हिं.स.)। वरुणराजाच्या पहिल्याच दमदार बरसातीने नांदेडकरांच्या ताटात मृग नक्षत्राचा स्वादिष्ट मुहूर्त घेऊन प्रवेश केला आहे. मृगाचे आगमन होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने शहरातील मासे बाजारपेठा अक्षरशः खवय्यांनी फुलून गेल्या.

मरळ, कतला आणि पापलेटच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. जाळ्यातून थेट बाजारात आलेल्या ताज्या माशांवर ग्राहकांनी अक्षरशः ताव मारत व्यापाऱ्यांची चांदी केली. यंदा मृग नक्षत्र सुरू होत असले तरी त्यापूर्वीच पावसाचे आगमन झाल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी परंपरेप्रमाणे माशांच्या खरेदीला प्राधान्य दिले. शहरातील तरोडा नाका, नाईक चौक, सिडको आणि इतवारा या प्रमुख मासे बाजारपेठांमध्ये पहाटेपासूनच ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. मृगाच्या मुहूर्तावर ताटात मासळीचा आस्वाद घेण्याची परंपरा जपण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

बाजारात मरळ, कतला आणि पापलेट या माशांना विशेष मागणी राहिली. ग्राहकांच्या वाढत्या गर्दीमुळे विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. एका दिवसातच लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला असून, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे मासेविक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

मृग नक्षत्रात मासे खाण्याची परंपरा केवळ चवीपुरती मर्यादित नसून तिच्यामागे आरोग्याचाही विचार दडलेला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्याच्या प्रारंभी बदलत्या वातावरणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी प्रथिने, ओमेगा-३ आणि फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले मासे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवणे, रक्ताभिसरण सुरळीत राखणे आणि शरीराला आवश्यक पोषणमूल्ये पुरविणे यासाठी मासे उपयुक्त मानले जातात. परंपरा, चव आणि आरोग्य यांचा संगम साधणाऱ्या मृग नक्षत्राच्या निमित्ताने यंदाही नांदेडकरांनी मासळीच्या मेजवानीला पसंती दिली असून, मासे बाजारपेठांमध्ये खऱ्या अर्थाने 'मत्स्य जल्लोष' पहायला मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande